Tuesday 7 March 2017

माझ्या आयुष्यातला 'तो'



माझ्या आयुष्यातला 'तो'!
एकदा ती म्हणली होती, स्थैर्य आणि शांतता हवी असेल तर तो पाहिजेच आयुष्यात.. एक भक्कम पुरूष हवा तीच्या साठी. एक समजुतदार तो असायलाच हवा होता पुढे जाताना.”  मला प्रश्न पडला होता तेव्हा, तो नव्हता म्हणून तीचं खरचंच इतकं विस्कटलं का आयुष्य?  तीची कोणती गरज पूर्ण झाली नसेल? मानसिक, की शारिरीक.? एकटं लढूनही तीला त्याचं महत्व का वाटत होतं.? एकटं लढूनही तीला त्याची गरज का वाटत होती? स्वत: मधल्या बाईपणाची जाणीव होण्यासाठी तो लागतोच का?

मग कळू लागलं, माझ्यातल्या स्त्री ची जाणीव करून द्यायला तो असतोच की नेहमी आजूबाजूला. मला हवा असो वा नसो.. माझा आयुष्यातला तो प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगळा भेटतो. पहिला तो भेटतो बाबा च्या रूपानं. अरे बाबा म्हणायची सवय नसलेल्या किंवा लावलीच गेली नसलेल्या मला त्याचा चेहरा म्हणूनच जास्त धीरगंभीर वाटतो. तो म्हणतो, अडकून राहून नकोस कशातच, पुढे जा, मी आहे. तो म्हणतो, १८ पूर्ण झालीस आता, तूझे निर्णय तू घे, फक्त मतदानाचा हक्क मिळतोय म्हणून बिंडोकासारखी नाचू नकोस, आता आलेल्या जबाबदाऱ्या घे, कुणाबरोबर राहायचं, कुणाबरोबर सेक्स करायचं ते नीट रॅशनली ठरव. तूला आम्ही स्वातंत्र्य देतोय बघ किती”, अशी फडतूस वाक्य कधीही न वापरणारा तो. मला मुलीसारखा वाढवणारा, आणि तू माझा मुलगाच आहेस असं म्हणून माझी किंमत कमी न करणारा तो म्हणूनच आश्वासक वाटतो.. 

पुढे त्याचा हात सोडून बाहेर पडल्यावर भेटलेल्या त्यानं भूरळ पाडली आणि तो छान वाटायला लागला. सगळे पुरूष आश्वासक असतातच या आतापर्यंत मेंदूला झालेल्या सवयीचा त्यानं चुरा केला ते बरं झालं.. त्या च्या नवीन घातकी रूपानं मग अजून पक्क होत गेलं मनात, अरे हो,मी मुलगी आहे!
 
मग कालांतरानं नवा तो निरागस रूपात भेटला. संयमी, शांत आणि पुन्हा धीरगंभीर. महत्वाच्या वेळेला, गरजेचे लोक भेटले की बऱ्याचश्या गोष्टी सोयीस्कर होतात, तसं झालं मग. माझ्यातल्या स्त्रीत्वाच्या पुढच्या पायरीवर त्याच्याच तर बरोबर आले.. 

शाळेतल्या मैत्रीणीशी एक टॉप सिक्रेट होतं लहानपणी, तीनं सांगितलं होतं तीच्या ओळखीचा तो इकडे-तिकडे हात लावतो.. तेव्हाच्या बालबुद्धीला आपल्या मैत्रिणीचं टॉप सिक्रेट आपल्यालाच माहिती असल्याचा गर्व होता. पण मग आमच्या दोघींपुरता आम्ही उपाय काढला होता. एक वही घेतली होती, त्यामध्ये त्या ला अर्वाच्च्य शिव्या लिहल्या.. मोकळं वाटलं होतं तेव्हा तीला.. अगदी स्वतंत्र वगैरे.. आता त्या वयात काय शिव्या लिहल्या असतील आठवतही नाही. ती वही नंतर कोणत्या तरी माळ्यावर फेकून दिली आम्ही. आणि मी तिला उगा मोठ्या बहिणीच्या थाटात सांगितलं होतं,ऐक तो दिसला ना की पळून जायचं जोरात.. लांब... नाहीतर सरळ आरडाओरडा कर. पण तेव्हा आपण त्याच्यासारख्या नाहीओत, काहीतरी विशेष आहोत, वेगळ्या आहोत असं नक्की वाटायला लागलं होतं. आपल्याकडे असं काय आहे की तो आपल्या मागे लागतोय? हे मात्र कळत नव्हतं.. काळाच्या ओघात कळू लागलं. 

तर असा तो बऱ्याच वळणांवर उभा असतो. मी मुलगी असल्याची जाणीव करून देण्यासाठी.. कधी तो आश्वासक असतो. कधी तो कोमेजून टाकणारा. पण आपण कोण आहोत हे कळायला लावणारा. मी मुलगी आहे म्हणून वेगळी आहे, विशेष आहे हे वाक्य दोन्ही अर्थी घेता येतं. माझ्या आयुष्यात असलेल्या आश्वासक, शांत, संयमी तो नं मला दुसरा सकारात्मक अर्थ शिकवला. त्याबद्दल त्याची ऋणी. !!

म्हणून मला ती चं हे वाक्य नेहमी पटतं. तो पाहिजे आयुष्यात, स्वत ची जाणीव करून द्यायला. आजच्या महिला दिनानिमित्तानं एवढंच... बाकी चालूच राहणार..  नोरा एफ्रोनचं वाक्य जरा बदलून- माझ्या आयुष्यातल्या त्या ला- Above all, he made me the heroin of my own life…