Wednesday, 14 September 2016

वाऱ्यासारखा पाऊस...!
कळायला लागल्यापासून जस जशी आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते तसं तसं आपण कुठे राहतो.. आपलं घर कुठल्या रस्त्यावर आहे.. मग हा रस्ता कोणत्या परिसरात.. आपला परिसर कोणत्या शहरात... हे शहर कोणत्या जिल्ह्यात.. हा जिल्हा कोणत्या राज्यात.. आणि आपण कोणत्या देशात.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वय वाढेल तसं..आणि झेपेल तशी मिळत जातात.. शाळेच्या भूगालाच्या पुस्तकातून अगदी प्राथमिक माहिती मिळत जाते आणि मग आपण कोणत्या खंडात आहोत.. आणि या पृथ्वीवर असे किती खंड आहेत याचा आवाका कळतो..
कधी महायुद्धांमधून, दहशतवादी कारवायांच्या इतिहासातून जगाचा आवाका कळत गेला.. आपल्या पायाखाली जी जमीन आहे ती कुठल्या भौगोलिक स्थानी आहे.. आपल्याकडे पाऊस पडतो तो कुठून येतो.. आणि आत्ता आपण नेमके जगात कुठे आहोत, अशा प्रश्नांची उत्तर शोधणं काहीजणांना कंटाळवाणं वाटतं.. तर काहींना फारच इंटरेस्टिंग.. जोपर्यंत पृथ्वीच्या नकाशावर आत्ता या क्षणी मी कुठे आहे हे कळत नाही तोवर माझं समाधान होत नाही हा माझा स्वभाव.. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच्या भौगोलिक स्थितीबद्दल, इथल्या वातावरणाविषय़ी जितकं काही हाती लागेल ते वाचतीये.. आणि त्यातून उलगडणारा ऑस्ट्रेलिया १० वी पर्यंतच्या भूगोलाच्या पुस्तकात का बरं सापडत नाही? असा प्रश्न पडतो.. 

भारतापेक्षा तिप्पट क्षेत्रफळ असलेल्या या खंडात... आणि तरीही फक्त ६ राज्यांच्या देशात.. एकाच राज्यात अगदी परस्परविरोधी हवामान असतं.. नकाशात पाहिला तर दक्षिण गोलार्धात ऑक्टोपसप्रमाणे दिसणारा ऑस्ट्रेलिया.. यातली राज्य म्हणजे नकाशावर हातानं रेषा ओढून काटकोनात विभागली असावीत अशी.. विस्तारलेल्या भूखंडामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियात ऋतूंचं एकच असं कॅलेंडर नाही..पण गंमत म्हणजे मान्सून चर्क मात्र वर्षात दोनदा असतं..  एवढच नाही तर ६ क्लायमॅटिक झोन्सचं मुख्य 2 सिझनल पॅटर्नमध्ये वर्गीकरण केलंय.
उत्तर ऑस्ट्रेलियातल्या विषुववृत्तीय,उष्णकटिबंधीय, उष्णकटीबंधा लगतच्या (Equatorial, Tropical and sub-tropical zones) प्रदेशात ड्राय झोन आणि वेट झोन असे हवामानाचे फक्त दोनच प्रकार अनुभवता येतात.. तर जसं जसं ऑस्ट्रेलियात खाली समशितोष्ण प्रदेशात येतो (Temperate Zone).. म्हणजेच कर्कवृत्ताच्या (line of cancer) खाली तसं तसं समर (उन्हाळा), ऑटम, विंटर (हिवाळा), स्प्रिंग असे ऋतू दर ३ महिन्यांनी बदलतात.. 


त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा नकाशा पाहिला तर ज्या राज्यांमधली शहरं या समशितोष्ण पट्ट्यात (Temperate Zone) आहेत तिथे ऋतूंचे खेळ पाहायला मिळतात.. तर उत्तरेच्या राज्यात परिस्थिती अगदीच वेगळी असते. उत्तरेकडच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात सहा महिने वेट सिझन. ज्याला मान्सून सिझन म्हणतात. आणि सहा महिने ड्राय सिझन असतो.. (यामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, नॉर्दन टेरेटरी आणि क्विन्सलँड या राज्यांच्या अगदी टोकाचा उत्तरेकडचा भाग आणि क्विन्सलँड राज्याची काही अंशी पूर्व किनारपट्टी येते.) एप्रिलपासून सुरू झालेला ड्राय सिझन ऑक्टोबरपर्यंत चालतो.. पण नोव्हेंबरपासूनच्या मॉन्सूनची आशा घेऊन ऑक्टोबर उजाडतो.. त्यामुळे आपल्याप्रमाणेच इथेही ऑक्टोबरच्या अखेरीस पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी दिसतात.. रणरणत्या उन्हात बीचेसवर लवडलेले नागरिक मान्सूनची तर वाट पाहत असतात..
उत्तरेकडून खाली येत जाऊ तसा ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी पसरलेला वाळवंटी भाग.. ऑस्ट्रेलियातील पाचही राज्यांच्या मध्यभागी वाळवंटी प्रदेश पसरलाय.. आणि मग तिथपासून सुरू होतं ऋतूंचं सौंदर्य.. दक्षिणी पट्ट्यातल्या शहरात.. ज्यात सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न, हॉबर्ट, अँडलेड, पर्थ ही महत्वाची शहरं येतात.. तिथे दर ३ महिन्यांनी ऋतू बदलतात..आणि त्यानुसार त्यांची जीवनशैली पण.. आता नुकताच स्प्रिंग सुरू झालाय... १९०१ ला स्वातंत्र्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियात हे ऋतू मात्र ब्रिटीश पद्धतीनंच आहेत...

ऑस्ट्रेलियात पाऊस कुठून येतो.. ?


डोक्यावर रोरावणारे हे काळे ढग येतात तरी कुठून याची उत्सुकता पुन्हा नकाशा उघडून पाहायला भाग पाडते.. आणि मग या देशातल्या हवामानशास्त्रज्ञांचं आणि विज्ञानप्रेमींचं लक्षही अगदी आपल्याप्रमाणेच प्रशांत महासागराकडे(Indian Ocean) का लागलेलं असतं हे कळतं.   विषुववृत्ताच्या (Equator) पट्ट्यातील प्रशांत महासागरात बदलणारं तापमान ऑस्ट्रेलियातला पाऊस यावेळी कसा असेल हे ठरवतात.. दक्षिण आणि उत्तर गोलार्धात वाऱ्याची दिशा वेगळी असते... पण मान्सूनमागील शास्त्र मात्र समान आहे.. मान्सून सक्रीय करण्यासाठी अनेक महत्वाच्या घटकांपैकी एक असलेला जो आपल्या भारतातल्या मान्सूनमध्येही तितकाच परिणामकारक असतो तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल.. (आयओडी).. प्रशांत महासागरात विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील बदलणाऱ्या तापमानाचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियातल्या पावसावर होतो.... न्यूट्रल, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा ३ प्रकारे विभागल्या जाणाऱ्या या आयओडीत नक्की भौगोलिक, वातावरणीय बदल काय होतात हे पाहाणं फारच इटरेस्टिंग आहे.. 

न्यूट्रल आयओडीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वायव्येकडील समुद्रात तापमान वाढतं आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेला विषुववृत्तावरून पश्चिमी वाऱ्यांची निर्मीती होते.. पण यामुळे ऑस्ट्रेलियात पाऊस पडत नाही.. मुळात यामध्ये ऑस्ट्रेलियापर्यंत येतील असे बाष्पयुक्त ढगच निर्माण होत नाहीत..
पण जेव्हा आयओडी निगेटिव्ह फेजमध्ये जातं तेव्हा मात्र ऑस्टेलियात मान्सून येतो... यावेळी प्रशांत महासागरातल्या पश्चिमी वाऱ्यांची गती वाढल्यामुळे वायव्य ऑस्ट्रेलियाजवळील पाणी अधिक तापतं आणि त्याचवेळी प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील पाणी त्यामानानं थंडावतं.. विषुववृत्ताच्या जवळ होत असणाऱ्या या तीव्र हवामान बदलामुळे वायव्येकडून(North- West) बाष्प घेऊन येणारे ढग ऑस्ट्रेलियात धडकतात.. आणि पश्चिम- दक्षिणेतील राज्यांत पाऊस पडतो..  हाच तो  मान्सून म्हणजेच वायव्य मौसमी वारे... (Northenwesterly Flow)

   
सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायणामुळे दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात आणि उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात वारे वाहत असतात.. एका गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात जाताना त्याची दिशा बदलते.. दक्षिण गोलार्धात ईशान्येकडून (North-East) खाली वाहणारे वारे उत्तर गोलार्धात येताना वायव्येकडून(North-West) येतात..  त्यामुळे ऑस्ट्रेलियात पहिल्या प्रकारचा मौसमी पाऊस पडतो वायव्येकडून आलेल्या वाऱ्यांमुळे.. तर विरूद्ध बाजूनं पाहिलं तर अग्नेयेकडून (South-East) उत्तर गोलार्धात जाणारे वारे पुढे भारतात शिरणारे नैऋत्य मौसमी वारे होतात(South West Monsoon).. हे दोन्ही दिशेचे वारे , म्हणजे वायव्येकडून खाली जाणारे आणि अग्नेयेकडून वर उत्तर गोलार्धात जाणारे वारे यांचा वाहण्याचा जो कालावधी आहे, त्या मधल्या काळात दोन प्रकारचे मौसमी पाऊस ऑस्ट्रेलियाला अनुभवता येतात.. वायव्य मौसमी वारे आणि अग्नेय मौसमी वाऱ्यांचा हा खेळ ऑस्ट्रेलियाला पाऊस देतो..नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत वायव्य मौसमी पाऊस पडतो (Northenwesterly Flow).. तर मे ते सप्टेंबर पर्यंत अग्नेय मौसमी(Southeasterly Flow) पाऊस पडतो.. 
 
पॉझिटिव्ह आयओडीचा मात्र अगदी याच्या उलट परिणाम होतो..आणि बाष्पयुक्त ढग अफ्रिकेच्या दिशेनं पुढे सरकतात.. या सगळ्या अल निनो आणि ला निनो हे अत्यंत परिणाम करणारे घटक आहेचेत.. थोडक्यात अरबी समुद्रात जास्त तापमान असेल तर ऑस्ट्रेलियात कमी पाऊस पडतो.. आणि बंगालच्या उपसागरात जास्त तापमान असेल तर ऑस्ट्रेलियात जास्त पाऊस पडतो.. 
 
दिशा आणि वाऱ्यांचे हे खेळ इंटरेस्टिंग आहेत.. समुद्रकिनाऱ्यालगतच्या शहरात तर पाऊस आणि वाऱ्यातला फरकही ओळखू येत नाही.. आत्ता ऊन आहे म्हणेपर्यंत दाटून येणारे काळे ढग.. आणि पाठ फिरावी इतक्यात वेगात पुढे सरकलेला पाऊस मग समजूतदार वाटतो..  

एकाच राज्यातल्या वेगवेगळ्या दिशांना जावं तसं अनुभवता येणारं परस्परविरोधी हवामान..इथेही पावसाची प्रतीक्षा असते..मागील काही वर्ष अग्नेय मौसमी वाऱ्यांमधून सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याची आकडेवारी आहे...  इथेही दुष्काळ असतो.. दुष्काळानं भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या बातम्याही वाचायला मिळतात.. मागच्या २०० वर्षात प्रचंड गंभीर दुष्काळांना ऑस्ट्रेलियन शेतकरी सामोरा गेला आहे.. मध्य ऑस्ट्रेलियात तर १९६३ सालचा दुष्काळ तर तब्बल ८ वर्ष म्हणजे १९६८ पर्यंत रखडला..  

एकाच देशात किंबहुना एकाच राज्यात बदलणारी घड्याळं, बदलणारे ऋतू दुसऱ्या खंडात आल्याची पुरेपूर जाणीव करून देतात.. हवामान विभागाच्या भाकितांचे व्हॉट्सअँप जोक करणारे आपण इथे येऊन मात्र इमानदारीत हवामान विभागाच्या अंदाजानुसारच दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स करतो.. आपल्या हवामान खात्याचा, त्यांच्या भाकितांचा आपण पार चोथा केलाय. पण इथे हवामान विभागाकडूनच त्यांच्या वेबसाईटवर अंदाज वर्तवणारे आणि सोप्या भाषेत सामान्यांना कळेल असे व्हिडिओ अपलोड होतात..त्यामुळे कदाचित यांची विश्वासार्हता वाढत असावी..देश समजून घेण्याची ही प्रोसेस फार मोठी असते.. त्यातही ज्या व्यवस्थेत आपण वाढलेलोही नाही त्या व्यवस्थेच्या नजरेतून समजून घेणं हा एक वेगळा अनुभव.. 

Thursday, 8 September 2016

A Train & A Tram...!
लहानपणी पुण्यात फर्ग्युसन रोडवरच्या दगडी घरात रहायचो.. लहानाची मोठी तिथेच झाले. त्यामुळे थंडीच्या दिवसात पहाटेच्या वेळी शिवाजीनगर रेल्वे  स्टेशनवरून येणारा रेल्वेच्या भोंग्याचा आवाज एकदम थ्रिलिंग वाटायचा..कधी कधी गूढही.. अगदी फक्त आपल्यालाच ऐकू येतोय की काय असं वाटायचं.. थंडीच्या दिवसात तर सवाई गंधर्व रंगात असताना बंदिशींचाही आवाज पोहोचायचा.. स्वत: गाणं शिकत असूनही जास्त भावायचा तो रेल्वेचा भोंगाच.. एकंदरीत काय तर असे आवाज अगदी मध्यरात्री ऐकू येत असल्यामुळे उत्सुकता खूपच वाढायची.. मग बाबांच्या मागे लागून शिवाजीनगर स्टेशनवर ट्रेन पाहायला जाण्याचा योग आला. अगदी नुकतच आठवायला लागलं असावं.. मग संध्याकाळी ७ नंतर ट्रेन पाहायला आम्ही शिवाजीनगरला पोहोचलो.. जेवढ्या वेळा त्यानंतर आम्ही तिकडे गेलो असू तेवढ्या वेळा इमानदारीत बाबांनी दोघांचं प्लॅटफॉर्म तिकिट काढून मग क्रॉस होणारी ट्रेन पाहिली आहे.. इमानदारीनं प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याचे ते दिवस होते.. रात्रीत लांबून दिसणारा ट्रेनचा ठिपका.. जवळ जवळ यायला लागल्यावर मी नकळत बाबांचा हात धरायचे.. आणि मग असं छातीवर दडपण आणत धडाधडा माझ्या समोरून ते धूड जायचं.. मला कोण सुपरगर्ल असल्याचा फिल यायचा.. मग बहुतांश वेळा ट्रेन पाहायला जाणे हा कार्यक्रम ठरलेला...

हे सगळं आता लिहायचं कारण आयुष्य गोल फिरून पुन्हा आपल्याला तशाच वळणावर आणून सोडतं.. भोवतालची माणसं, परिस्थिती, आपली परसेपशन्स बदललेली असतात कदाचित.. पण उत्सुकता तीच असते.. कारण मेलबर्नमध्ये आल्याच्या पहिल्याच दिवशी मला अत्यंत आवडणाऱ्या ट्रॅममध्ये बसले.. आणि लहानपणी दूरून दिसणारा तो लुकलुकणारा दिवा परत आठवला.. मग नंतर तर ज्या ठिकाणी फ्री ट्रॅम झोन आहे ती सिटी पाहण्यासाठी मी गौरवला घेऊन सिटी सर्कल ट्रॅम(जी माझी अत्यंत प्रिय झालीये..)त्यातच बसले.. आणि मेलबर्नमधल्या जेमतेम डेक्कन-कोथरूड एवढ्या भागात घिरट्या मारत होते.

मुंबईकरांसाठी लोकल, पुणेकरांसाठी टू व्हिलर जितकी जीव की प्राण त्यापेक्षा कमी असेल कदाचित पण इथल्या लोकांसाठी अशीच काहीशी ट्रॅम.. आता तर सिटीमधल्या एका ठराविक भागात, ज्याला सीबीडी,म्हणतात तिथे फुकट प्रवास करता येतो.. फुकट अधिक खुणावणं आपल्या रक्तातच आहे. पण फुकटच्या नावाखाली उल्लू बनवलं जात नाही अशी ही व्यवस्था.. लोकलसारखे आगाऊ बायकांचे अड्डे इथे ट्रॅममध्ये जमत नाहीत.. सतत बडबड नसते.. असली तरी अगदी तुला मलाच ऐकू येईल अशा आवाजात.. महत्वाचे रस्ते हाताच्या बोटावर मोजता येतील असे.. मग हॅपनिंग शहर संपतच.. मग पुढच सौंदर्य वेगळंच असतं..

२०१४ च्या आकडेवारूनुसार २५० किलोमीटरचा ट्रॅक, ४९३ ट्रॅम्स, २५ रूट्स, १७६३ ट्रॅम स्टॉप्स..असं पसरलेलं हे जगातलं सर्वात मोठं ट्रॅमचं जाळं..यानंतर बर्लिन,मॉस्को, व्हिएन्नाच्या ट्रॅम्स् येतात.. मेलबर्नची ही ट्रॅम अत्यंत सुटसुटीत.. अगदी स्वत: ची गाडी वाटावी अशी..  ट्रॅमच्या स्टॉप्सवर मायकी कार्ड रिचार्ज करण्यासाठीची मशिन्स.. शहराबाहेर जायला मायकी कार्ड पंच करायचं.. शहरातल्या शहरात तर सगळा प्रवास फुकटच आहे.. अत्यंत रेखीव, धिम्या गतीची ट्रॅम त्यामुळेच अधिक आकर्षित करते.. कधी ट्रॅमध्ये एखाद्यानं एन्रिके किंवा मायकल जॅक्सन साँग लावलेलं असतं.. मग त्या बॅकग्राऊंड म्यूझिकवर कुणीतरी रोमँटिक झालेलं असतं..एकमेकांच्यात पूर्णपणे बुडालेलं... ट्रॅम स्टॉप्सच्या शेजारी अत्यंत उत्तम दर्जाचे कलाकार रात्री थंड वाऱ्यात गिटार घेऊन गाणी म्हणत असतात तेव्हा ट्रॅमसाठी वाट पाहाणं जास्त आवडतं.. तो त्याच्या तंद्रीत गात असतो.. आपण आपल्या तंद्रीत ऐकायचं.. कधी हातात ब्रिझर घेऊन.. कधी नुसतीच कॉफी.. मग कधीतरी तो त्याचा गाशा गुडाळून अशाच कुठल्याशा ट्रॅममध्ये बसून पुढे रवाना होतो..

तर परवा शहराबाहेर जाण्याचा योग आला. ट्रॅममध्येच कार्ड पंच केलं आणि बसले.. शहराबाहेर १ स्टॉप संपत नाही तोवर एक माणूस मागे येऊन अत्यंत विनम्र आवाजात म्हणाला, हेलो..हाऊ आर यू?.. आता इथे सहज कुणी कुणाला हाय..सॉरी वगैरे म्हणतंच.. तर मग हे पण त्यातलच असेल म्हणून मी म्हणलं , हाय आय एम फाईन...??.. तर तो म्हणाला, आय एम सो सॉरी टू डिसर्ब यू, बट कॅन आय सी यूर मायकी कार्ड?..टू चेक?... तेव्हा मला कळलं ओके हा टीसी आहे.. इतका आदबीनं हसून बोलणारा टीसी पाहून वाटलं घे बाबा... इतका चांगला वागलास.. पंच केलं असीन तरी फाईन देऊ शकते मी.. वर्षानुवर्ष आपल्याला पाडल्या गेलेल्या सवयी अशा इकडे येऊन धक्का खातात.. टीसीच्या हाणामारीचे व्हीज बातमी म्हणून चवीचवीनं करताना, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असं काहीतरी होतंय याची जाणीव तरी होती का.. विचार आला, या टीसीला दिली असतील का या ट्रॅमच्या व्यवस्थेनं महिन्याची टार्गेट्स?.. किंवा कुणाच्या तुंबड्या भरण्याची घृणास्पद वेळ याच्यावर येत असेल का?.. पंच केलं नाही तर फाईन घेताना याला येत नसावेत ‘वरच्यांचे’ फोन्स.. आपलाच माणूस आहे सोड म्हणून..किंवा फाईन देताना कुणी अरेरावीत सांगत नसेल स्वत:ची ‘ओळख’.. व्यवस्था आपल्याला काही वेळेला असं म्हणायला भाग पाडते, की भ्रष्टाचार करा एकवेळ पण आम्हाला तरी बऱ्या सुविधा द्या, ज्या जगण्यालायक असतील. या व्यवस्थेत भ्रष्टाचार नसेल असं नाही.. पण सामान्यांना पावलोपावली, उठता बसता भोगावा लागत नाही हे महत्वाचं..

ट्रॅम स्टॉपवर रात्रीच्या वेळी उभं असताना लांबून दिसणारी ट्रॅम आजही शिवाजीनगरला घेऊन जाते कधीतरी... मनातल्या मनात असंख्य गोष्टींची तुलना करत राहतो आपण.. कुठली व्यवस्था किती खोलवर सडलेली त्यावर तिकडच्या माणसांचं जगणं,वागणं,चालणं,बोलणं अवलंबून असतं..
पण अर्थात एक गोष्ट अत्यंत म्हत्वाची आहे. – If people understood how the economic system works, there'd be a revolution in a minute- Henry Ford

Tuesday, 6 September 2016

 Mumbai to Melbourne Via HongKong..!

मुंबईमध्ये फ्लाईटमध्ये बसले आणि मागच्या सीटवर बसलेला एक फॉरेनर मुलगा म्हणाला - यू लूक जस्ट लाईक वन ऑफ माय बेस्ट फ्रेस्ड्स....आय व्हॉज शॉक्ट़्ड व्हेन आय सॉ यू बोर्डिंग.. तेव्हाच त्याला विचारलं..बाबा रे कुठेपर्यंत सोबत करणारेस माझी.. पार ऑस्ट्रेलियापर्यंत का.. तर म्हणाला नाही नाही.. हाँगकाँगला उतरणार.. मी याच फ्लाईटचा क्रू मेंबर आहे.. आज फक्त ड्युटीवर नाही. फ्लाईट उडलं की मस्त गप्पा मारूयात.. १ तास उशीरानं टेक ऑफ झाल्याझाल्या मी डोक्यावरून शाल टाकली..त्याला कळायचं ते कळलं असावं..  हाँगकाँगला घाईघाईतच उतरले.. त्याची नजर चुकवत विमानाच्या बाहेर पडून पळाले कारण कनेक्टिंग फ्लाईट अर्धा तासात होतं.. विमानाबाहेर पडत नाही तर नेक्स्ट फ्लाईटची अटेन्डंट उभीच समोर.. म्हणली तुमचं कनेक्टिंग फ्लाईट मिस झालंय. आता सकाळचे १० वाजलेत.. रात्रीच्या ८ च्या नेक्स्ट फ्लाईटमध्ये तुम्हाला जागा देत आहोत.. प्रचंड संताप आला.. पण कसंय एरवी पुण्या मुंबईत घसे फाडून भांडणारे आपण अशावेळी निमूट ऐकून घेतो.. ४ कुपन्स मिळाली खाण्याची.. पण पुढे जायचं कुठे.. पुढच्या फ्लाईटपर्यंत पोहोचायला एअरपोर्टवर मिनी मेट्रो होती. पण एरवी अगदी जोशात सगळं करणाऱ्या मला ना ती भाषा समजत होती. ना त्यांना माझं इंग्रजी.. जरा पुढे गेले आणि मागून त्यानं हाक मारली.. उच्चार भन्नाट केला माझ्या नावाचा... पण मला म्हणाला -डॉन्ट वरी...आय विल गाईड यू.. इफ यू वॉन्ट यू कँन टेक व्हिसा ऑन अराव्हल.. आय वील शो यू ह़ृाँगकाँग... आधी ज्याचा पिच्छा सोडवत होते त्याच्याच मागे मागे मेट्रोत चढले.. मग तो मला म्हणाला मी इंडियन होतो....मुळचा मुंबईचा..  आता इकडचा झालो.. आणि नाव सांगितलं.. माझ्या पायाखालची जमीनच सरकली.. आतापर्यंत फॉरेनर वाटणारा तर मुंबईचा निघाला राव.. पण म्हणलं आता काही फिरत नाही मी हाँगकाँग.. तर म्हणाला ठिके..पुन्हा कधी चुकून भेटलो तर लक्षात ठेव..  एस्कलेटर वरून खाली उतरले.. आणि तो पुढे पुढे चालत होता. काही वेळानं तो एवढा पुढे गेला की डिपार्चरला वळताना त्याला बाय म्हणायला काय म्हणून हाक मारावी कळेचना.. मला आजच्या क्षणापर्यंत त्याचं नाव आठवत नाही.. मी खूप प्रयत्न केला घरी आल्यावर आठवण्याचा. पण मला फक्त त्याचा चेहरा आठवतोय..एकच व्यक्ती आपल्या वेळेप्रमाणे किती वेगवेगळी वाटते नै...
सकाळचे ६ वाजत आले होते.. रात्रभर जागरण.. आदल्या दिवशी हॉंगकाँग एअरपोर्टवर दिवसभर ताटकळत बसल्यानंतर अखेरीस हाँगकाँगवरून रात्री ८ ला मेलबर्नच्या दिशेनं  उडलेलं आमचं फ्लाईट.. आता आणखी काही सरप्राईज नको..
प्रश्न नकोत.घोळ नकोत... सगळं सुरळीत झालं तर बरं होईल असा विचार रात्रभर करत असताना समोरच्या स्क्रिनवर ऑस्ट्रेलियात विमान आल्याचा मॅप दिसला.. आपल्या डोक्यात एकाच वेळी किती घड्याळं असतात पाहा.. आत्ता घरी..म्हणजे भारतात ११ १२ किंना १ वाजला असेल.. मेलबर्नमध्ये ५ ६ झाले असतील.. आई बाबा रसिका  झोपायच्या तयारीत असतील पण गौरव मला घेण्यासाठी इकडे उठला असेल.. हाँगकाँगमध्ये किती वाजले असतील.. आणि आत्ता मी ज्या भूमीवर आहे तिेथे किती वाजले असतील...अशी सगळी डोक्यात घड्याळं जुळवत बसले होते..
शेजारच्या सीटवर घोरणारा जर्मन माणूस जास्तीच घोरायला लागल्यावर हाताला धक्का दिला त्याच्या.. तशी त्याला जरा जाग आली.. तो पण मॅप पाहू लागला.. आता मी विमानात एकटीच जागी नाही अशा भावनेनं जरा बरं वाटलं.. लँडिंगच्या तासभर आधी एअरहॉस्ट्रेस पुन्हा एकदा मील घेऊ आली.. म्हणली तुम्ही हिंदू व्हेज मील मागवलं होतं ना.. आता रात्री जेवले ते काय.. या खाण्याचे पैसे घेईला का..असे अनेक बाळबोध वेडे प्रश्न प्रवासानं जड झालेल्या डोक्यात आले.. पण तसंही पहाटे पहाटे हाती दिलेलं ते जेवण काही गेलं नाही..
काही वेळानं मॅपवर मेलबर्न जवळ जवळ दिसू लागल्यावर आता बास हा विमान प्रवास आणि उतरवा पृथ्वीवर असं झालं.. पण सांगण्याची सोय कुणाला.. आणि तेवढ्यात पायलट म्हणला खराब हवामान झालंय खूप.. आधी एका रन वेवर लँडिंग करून परत टेकऑफ घेणार आहोत.. सीटबेल्ट्स काढू नका.. आता मात्र मी डोळे गच्च मिटले.. मागच्या २० तासांमध्ये विमानाची घरघर असह्य झाली होती.. आणि नेहमीप्रमाणे जे नको हवं होतं..तेच तेच घडच होतं.. तुडुंब पावसात आधी एका रनवेवर केलेलं लँडिंग..परत टेकऑफ..मग आकाशातला विजांचा खेळ.. थडथडणारं विमान  खराब हवामानामुळे गचके खात खात अखेरीस मेलबर्नच्या रनवेला  लागलं.. या सगळ्यानं माझ्या पोटात जो काही कालवा झाला तो वेगळाच.. आता प्रवास संपला... सुटकेचा निश्वास असा कधी सोडला नव्हता..
अखेरीस इमिग्रेशनच्या  प्रश्नांना आणि आगाऊ सल्ल्यांना उत्तरं देत देत बाहेर आले आणि समोर गौरव दिसला.. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ती सकाळ उजाडल्यावर आत्ताच्या प्रवासात आलेले बरे वाईट अनुभव, अचानक कुठल्याशा गोष्टीप्रमाणे तोंडातून बाहेर पडू लागले. एखाद्या प्रसंगातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर ती सांगताना त्याची होत जाणारी गोष्ट ..भारी मजेशीर प्रोसेस असते..
टॅक्सीमध्ये बसले आणि खरोखरच वेगळ्या खंडात आल्याचा फील आला.. अत्यंत शिस्तबद्ध.. आपापल्या जगात व्यापलेल्या माणसांना शेजारच्याकडे टक लावून पाहू नये याचं योग्य प्रशिक्षण असतं.. अर्थात
टेक्नोलॉजीनं असे मॅनरिझम आणखी नीट तयार केलेत. म्हणजे शेजारी कुणी बसलं असो नसो.. मोबाईल..लॅपटॉपमध्येच डोकी घातलेली माणसं असल्यामुळे मी कशी दिसत असीन.. मग मी अमूक अमूक कपडे घालून बाहेर पडू का..वगैरे असे प्रश्न फारसे पडतच नाहीत.. लोकलच्या फस्टक्लासच्या डब्यात शिरताना गबाळे कपडे नाहीयेत ना असा विचार सहाजिक येतो.. पण ट्रॅमनी प्रवास करताना इथे क्लासेस नाहीत.. सगळी माणसं एकाच ट्रॅममध्ये.. आणि त्यातही आपल्याकडे पाहायला.. त्यावर मनातल्या मनात का होईना कमेंट करायला इकडे कुणालाही इच्छा नसते.. म्हणजे वेळ असतो .. पण मुळात इकडे कुणी तसं फारसं अतीउत्सुक नसतं कपड्यांवरून किंवा रंगावरून नजर वाकडी करायला.. अगदी हे सगळं करतच असेल कोण तर ते बहुतांशी भारतीयच असतात.. अर्थात चूक बरोबर नाही.. कधी उत्सुकता म्हणून..कधी कल्चरल धक्का म्हणून किंवा आणखी काही.. पण तिरक्या नजरेनं निरखणे हा प्रकार भारतीयांच्या रक्तातच असतो.. तो बरोबर चूक असं ठरवू शकत नाही..
कधी गाडी चालवतानाही पाळले नसतील असे  सिग्नल आपण इकडे चालताना पाळायला शिकतो.. रस्ता क्रॉसिंग करायच्या आधी बटण दाबा.. समोर ग्रीन सिग्नल झाला कीच पाऊल पुढे टाकायचं... असे सिग्नल पुणे मुंबईत असते तर काय काय बातम्या करता आल्या असत्या याच्या विचारात मी खूप इप्रोव्हाईजेशन्स केलीयेत.. म्हणजे बटणंच चोरीला गेली.. किंवा बटण लावण्याच्या टेंडरमध्ये घोटाळे.. किंवा चालणाऱ्याचा सिग्नल आणि ट्रॅफिकसाठीचा ग्रीन सिग्नल एकत्र लागतोच कसा याच्या विचारणेसाठी टाकलेला माहितीचा अधिकार वगैरे...
स्वच्छतेच्या बाबतीत तर तुम्हाला पहिल्यांदा स्वतचीच लाज वाटते.. म्हणजे आपण स्वाभिमान वगैरे असे शब्द विविध राजकीय पक्षांकडून खूप शिकलेले असतो.. पण कचरा पेटी असूनही आपण पेटीच्या बाहेर कचरा टाकतो तेव्हा आपला स्वाभिमान दुखावला जात नाही.. शेजारी बाईकवाला असतानाही थुंकतो तेव्हा काही लाज वाटत नाही.. इथे मात्र असं नाही.. परवाच कचरा टाकताना पेपरचा एक तुकडा पेटीच्या पलिकडे पडला म्हणनू सायकल पूर्ण वळवून तो तुकडा उचलून पेटीत टाकणारा मुलगा पाहिला.. आणि वाटलं याला सेल्फ एस्टिम म्हणत असावेत का.. मावा पानसदृश्य पदार्थ तोंडात घेऊन बोलणारे सामान्य लोक नाही तर राजकारणीही दिसत नाहीत.. त्यामुळे हातात बूम पकडून गर्दीत बाईट घेण्याची वेळ आली तर इकडे पत्रकारांना राजकारण्यांची शिसारी येत नसावी... राईट टू पी सारखे प्रश्न इथे भेडसावत नाहीत.. सार्वजनिक शौचालयंही स्वच्छ.. बरं अगदी ५० मीटरच्या अंतरांवर कचरा पेट्या असल्यामुळे हातातलं कुठं टाकावं असा प्रश्न पडतच नाहीत..
माझ्यापेक्षा जास्त प्रश्न माझ्या अनेक मित्र मैत्रीणींना होते.. अगदी तिकडे ब्युटी पार्लरची काय व्यवस्था इथपासून ते कोणत्या भाज्या मिळतात.. दारूची सोय कशी असते इथपर्यंत.. या प्रश्नांची उत्तरही मला पहिल्याच आठवड्यात मिळाली..
सगळीकडे प्रश्न फक्त एवढाच यायचा की आपण अमूक अमूक गोष्ट एवढ्या एवढ्या डॉलरला घेतली.. म्हणजे बापरे एवढ्या रूपयांत.. असा विचार त्रास देत असे.. आता याची सवय झाली..
पहिल्यांदा व्हिक्टोरियाच्या भाजी मंडईत गेल्यावर अत्यंत टापटीप भाजीवाले पाहून आश्चर्यच वाटलं.. सुंदर आयमेकअप केलेल्या मुली ज्या बहुतांश ऑस्ट्रेलियन नसतात.. आणि टापटीप मुलं पाहून भाज्या खरेदीला हुरूप येतो.. कांद्याची पात ३ डॉलला पहिल्या दिवशी घेतली तर वाटलं आयला १५० रूपयांची १ भाजी... मग अशी सवयच सोडून दिली... पण पहिल्या पहिल्यांदा गम्मत वाटायची.. आता अजून शोधतीये.. आपल्या बाजार समितीत येतात तशा या भाज्या येतात कुठून.. बरं १ किलो वजन भरलं असेल तरी २ बटाटे एक्स्टॉ टाका की असं म्हणता येत नाही इथे.. किंवा मनाप्रमाणे उचलून टाकता येत नाहीत.. अशा हातचालाखीच्या सवयीही सोडाव्या लागल्या इथे..
ब्युटी पार्लर म्हणजे पहिल्या पहिल्यांदा न परवडणारी गोष्टच वाटत होती.. कारण साध्या आयब्रो करण्यासाठी २० डॉलर म्हणजे १ हजार रूपये द्यायचे.. काहीही काय.. पण अशा डॉलरी धक्क्यातून आपण सावरतो लगेच..
माझ्या एका भारतातल्या मित्रानं प्रश्न विचारला होता..प्रेयसीला लपवण्यासाठी गप्पा मारण्यासाठी झेड ब्रिज..सारसबाग.. तत्सम काही झाडाझुडपांची ठिकाणं असतात का... त्याला उत्तर आता काय द्यावं.. इकडे रस्त्यावर किस केलं तरी तुम्हाला कुणी बघत नाही.. बघितलं तरी प्रश्न विचारत नाही.. आणि नैतिकतेचे आणि परंपरेचे आगाऊ ढोंगी  सल्ले देत नाही.. त्यामुळे बसस्ट़़ॉ़प्सवर .. ट्रॅममध्ये.. रस्त्यावर... काॅफीशॉप्समध्ये कॉफी विथ  रोमॅन्सही असतो..जो तुम्हाला जिवंत ठेवतो..सेक्सचा बाऊ नसतो.. परवाच एक काका सांगत होते, एका ऑस्ट्रेलियन आईनं (काकांची ती मैत्रीण)..तिनं फोन केला मुलीला.. मुलगी म्हणली फोनवर- ओह मॉम...आय एम इन द मीडल ऑफ मेटिंग.. डॉन्ट यू गेट इट.... मी ऐकताना आवाक.. आपण कितीही मुक्तपणाचा बुरखा पांघरला असला तरी तो इकडे काढून फेकून द्यायला लागतो.. स्पर्शाला नैतिकतेची खोटी आवरणं लावू नयेत कदाचित.. ओघानंच मग बसस्टॉप वर.. ट्रॅममध्ये एकमेकांच्या गुरफटलेल्या त्या दोघांबद्दल चूक की बरोबर असं मत व्यक्त करणंही मुर्खपणाचं वाटत..
जगायला शिकवणाऱ्या अनेक गोष्टी या शहरात आहेत.. अजून खूप ठिकाणं बघायचीयत.. इकडचेही काही प्रश्न म्हणून असतीलच ना.. पण ते प्रश्न रोजच्या जगण्यावर घातक परिणाम करत नाहीत.. इकडेही कमी पगारात नाराज कामगार असतीलच की.. घरी वेळ देता येत नाही म्हणून निराश झालेले नोकरदार आहेत.. शेवटी व्यवस्था काही ना काही प्रश्न निर्माण करतेच..
पण हीच व्यवस्था जगू देते.. जगायचं असतं.. नोकरी करूनही जगता येतं.. आणि सहज साधं सोपंही आयुष्य असतं हे हळू हळू कळायलं लागलंय. पाणी, खड्डे, सार्वजनिक व्यवस्थेच्या विरोधात अजून तरी आंदोलनं पाहिली नाहीयेत.. कारण रोजच्या जगण्यासाठी काय लागतं ते सरकार तुम्हाला देतं.. ते टिकवण्यासाठी रोजची धावपळ तर कुणालाच कुठे चुकत नाही.. भावलेलं मेलबर्न अजून असंच  लिहायचं आहे.. अगदी प्राथमिक पाहूनही अनेक गोष्ट कळल्या.. आता आणखी पाहू काय काय दिसतंय.
शेवटी इथे येऊन कसं व्हावसं वाटतं तर... "She was free in her wildness...She was a wanderess..a drop of free water..She belonged to no man and to no city...'- Roman Payne