Wednesday, 14 September 2016

वाऱ्यासारखा पाऊस...!
कळायला लागल्यापासून जस जशी आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते तसं तसं आपण कुठे राहतो.. आपलं घर कुठल्या रस्त्यावर आहे.. मग हा रस्ता कोणत्या परिसरात.. आपला परिसर कोणत्या शहरात... हे शहर कोणत्या जिल्ह्यात.. हा जिल्हा कोणत्या राज्यात.. आणि आपण कोणत्या देशात.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वय वाढेल तसं..आणि झेपेल तशी मिळत जातात.. शाळेच्या भूगालाच्या पुस्तकातून अगदी प्राथमिक माहिती मिळत जाते आणि मग आपण कोणत्या खंडात आहोत.. आणि या पृथ्वीवर असे किती खंड आहेत याचा आवाका कळतो..
कधी महायुद्धांमधून, दहशतवादी कारवायांच्या इतिहासातून जगाचा आवाका कळत गेला.. आपल्या पायाखाली जी जमीन आहे ती कुठल्या भौगोलिक स्थानी आहे.. आपल्याकडे पाऊस पडतो तो कुठून येतो.. आणि आत्ता आपण नेमके जगात कुठे आहोत, अशा प्रश्नांची उत्तर शोधणं काहीजणांना कंटाळवाणं वाटतं.. तर काहींना फारच इंटरेस्टिंग.. जोपर्यंत पृथ्वीच्या नकाशावर आत्ता या क्षणी मी कुठे आहे हे कळत नाही तोवर माझं समाधान होत नाही हा माझा स्वभाव.. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच्या भौगोलिक स्थितीबद्दल, इथल्या वातावरणाविषय़ी जितकं काही हाती लागेल ते वाचतीये.. आणि त्यातून उलगडणारा ऑस्ट्रेलिया १० वी पर्यंतच्या भूगोलाच्या पुस्तकात का बरं सापडत नाही? असा प्रश्न पडतो.. 

भारतापेक्षा तिप्पट क्षेत्रफळ असलेल्या या खंडात... आणि तरीही फक्त ६ राज्यांच्या देशात.. एकाच राज्यात अगदी परस्परविरोधी हवामान असतं.. नकाशात पाहिला तर दक्षिण गोलार्धात ऑक्टोपसप्रमाणे दिसणारा ऑस्ट्रेलिया.. यातली राज्य म्हणजे नकाशावर हातानं रेषा ओढून काटकोनात विभागली असावीत अशी.. विस्तारलेल्या भूखंडामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियात ऋतूंचं एकच असं कॅलेंडर नाही..पण गंमत म्हणजे मान्सून चर्क मात्र वर्षात दोनदा असतं..  एवढच नाही तर ६ क्लायमॅटिक झोन्सचं मुख्य 2 सिझनल पॅटर्नमध्ये वर्गीकरण केलंय.
उत्तर ऑस्ट्रेलियातल्या विषुववृत्तीय,उष्णकटिबंधीय, उष्णकटीबंधा लगतच्या (Equatorial, Tropical and sub-tropical zones) प्रदेशात ड्राय झोन आणि वेट झोन असे हवामानाचे फक्त दोनच प्रकार अनुभवता येतात.. तर जसं जसं ऑस्ट्रेलियात खाली समशितोष्ण प्रदेशात येतो (Temperate Zone).. म्हणजेच कर्कवृत्ताच्या (line of cancer) खाली तसं तसं समर (उन्हाळा), ऑटम, विंटर (हिवाळा), स्प्रिंग असे ऋतू दर ३ महिन्यांनी बदलतात.. 


त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा नकाशा पाहिला तर ज्या राज्यांमधली शहरं या समशितोष्ण पट्ट्यात (Temperate Zone) आहेत तिथे ऋतूंचे खेळ पाहायला मिळतात.. तर उत्तरेच्या राज्यात परिस्थिती अगदीच वेगळी असते. उत्तरेकडच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात सहा महिने वेट सिझन. ज्याला मान्सून सिझन म्हणतात. आणि सहा महिने ड्राय सिझन असतो.. (यामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, नॉर्दन टेरेटरी आणि क्विन्सलँड या राज्यांच्या अगदी टोकाचा उत्तरेकडचा भाग आणि क्विन्सलँड राज्याची काही अंशी पूर्व किनारपट्टी येते.) एप्रिलपासून सुरू झालेला ड्राय सिझन ऑक्टोबरपर्यंत चालतो.. पण नोव्हेंबरपासूनच्या मॉन्सूनची आशा घेऊन ऑक्टोबर उजाडतो.. त्यामुळे आपल्याप्रमाणेच इथेही ऑक्टोबरच्या अखेरीस पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी दिसतात.. रणरणत्या उन्हात बीचेसवर लवडलेले नागरिक मान्सूनची तर वाट पाहत असतात..
उत्तरेकडून खाली येत जाऊ तसा ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी पसरलेला वाळवंटी भाग.. ऑस्ट्रेलियातील पाचही राज्यांच्या मध्यभागी वाळवंटी प्रदेश पसरलाय.. आणि मग तिथपासून सुरू होतं ऋतूंचं सौंदर्य.. दक्षिणी पट्ट्यातल्या शहरात.. ज्यात सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न, हॉबर्ट, अँडलेड, पर्थ ही महत्वाची शहरं येतात.. तिथे दर ३ महिन्यांनी ऋतू बदलतात..आणि त्यानुसार त्यांची जीवनशैली पण.. आता नुकताच स्प्रिंग सुरू झालाय... १९०१ ला स्वातंत्र्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियात हे ऋतू मात्र ब्रिटीश पद्धतीनंच आहेत...

ऑस्ट्रेलियात पाऊस कुठून येतो.. ?


डोक्यावर रोरावणारे हे काळे ढग येतात तरी कुठून याची उत्सुकता पुन्हा नकाशा उघडून पाहायला भाग पाडते.. आणि मग या देशातल्या हवामानशास्त्रज्ञांचं आणि विज्ञानप्रेमींचं लक्षही अगदी आपल्याप्रमाणेच प्रशांत महासागराकडे(Indian Ocean) का लागलेलं असतं हे कळतं.   विषुववृत्ताच्या (Equator) पट्ट्यातील प्रशांत महासागरात बदलणारं तापमान ऑस्ट्रेलियातला पाऊस यावेळी कसा असेल हे ठरवतात.. दक्षिण आणि उत्तर गोलार्धात वाऱ्याची दिशा वेगळी असते... पण मान्सूनमागील शास्त्र मात्र समान आहे.. मान्सून सक्रीय करण्यासाठी अनेक महत्वाच्या घटकांपैकी एक असलेला जो आपल्या भारतातल्या मान्सूनमध्येही तितकाच परिणामकारक असतो तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल.. (आयओडी).. प्रशांत महासागरात विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील बदलणाऱ्या तापमानाचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियातल्या पावसावर होतो.... न्यूट्रल, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा ३ प्रकारे विभागल्या जाणाऱ्या या आयओडीत नक्की भौगोलिक, वातावरणीय बदल काय होतात हे पाहाणं फारच इटरेस्टिंग आहे.. 

न्यूट्रल आयओडीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वायव्येकडील समुद्रात तापमान वाढतं आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेला विषुववृत्तावरून पश्चिमी वाऱ्यांची निर्मीती होते.. पण यामुळे ऑस्ट्रेलियात पाऊस पडत नाही.. मुळात यामध्ये ऑस्ट्रेलियापर्यंत येतील असे बाष्पयुक्त ढगच निर्माण होत नाहीत..
पण जेव्हा आयओडी निगेटिव्ह फेजमध्ये जातं तेव्हा मात्र ऑस्टेलियात मान्सून येतो... यावेळी प्रशांत महासागरातल्या पश्चिमी वाऱ्यांची गती वाढल्यामुळे वायव्य ऑस्ट्रेलियाजवळील पाणी अधिक तापतं आणि त्याचवेळी प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील पाणी त्यामानानं थंडावतं.. विषुववृत्ताच्या जवळ होत असणाऱ्या या तीव्र हवामान बदलामुळे वायव्येकडून(North- West) बाष्प घेऊन येणारे ढग ऑस्ट्रेलियात धडकतात.. आणि पश्चिम- दक्षिणेतील राज्यांत पाऊस पडतो..  हाच तो  मान्सून म्हणजेच वायव्य मौसमी वारे... (Northenwesterly Flow)

   
सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायणामुळे दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात आणि उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात वारे वाहत असतात.. एका गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात जाताना त्याची दिशा बदलते.. दक्षिण गोलार्धात ईशान्येकडून (North-East) खाली वाहणारे वारे उत्तर गोलार्धात येताना वायव्येकडून(North-West) येतात..  त्यामुळे ऑस्ट्रेलियात पहिल्या प्रकारचा मौसमी पाऊस पडतो वायव्येकडून आलेल्या वाऱ्यांमुळे.. तर विरूद्ध बाजूनं पाहिलं तर अग्नेयेकडून (South-East) उत्तर गोलार्धात जाणारे वारे पुढे भारतात शिरणारे नैऋत्य मौसमी वारे होतात(South West Monsoon).. हे दोन्ही दिशेचे वारे , म्हणजे वायव्येकडून खाली जाणारे आणि अग्नेयेकडून वर उत्तर गोलार्धात जाणारे वारे यांचा वाहण्याचा जो कालावधी आहे, त्या मधल्या काळात दोन प्रकारचे मौसमी पाऊस ऑस्ट्रेलियाला अनुभवता येतात.. वायव्य मौसमी वारे आणि अग्नेय मौसमी वाऱ्यांचा हा खेळ ऑस्ट्रेलियाला पाऊस देतो..नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत वायव्य मौसमी पाऊस पडतो (Northenwesterly Flow).. तर मे ते सप्टेंबर पर्यंत अग्नेय मौसमी(Southeasterly Flow) पाऊस पडतो.. 
 
पॉझिटिव्ह आयओडीचा मात्र अगदी याच्या उलट परिणाम होतो..आणि बाष्पयुक्त ढग अफ्रिकेच्या दिशेनं पुढे सरकतात.. या सगळ्या अल निनो आणि ला निनो हे अत्यंत परिणाम करणारे घटक आहेचेत.. थोडक्यात अरबी समुद्रात जास्त तापमान असेल तर ऑस्ट्रेलियात कमी पाऊस पडतो.. आणि बंगालच्या उपसागरात जास्त तापमान असेल तर ऑस्ट्रेलियात जास्त पाऊस पडतो.. 
 
दिशा आणि वाऱ्यांचे हे खेळ इंटरेस्टिंग आहेत.. समुद्रकिनाऱ्यालगतच्या शहरात तर पाऊस आणि वाऱ्यातला फरकही ओळखू येत नाही.. आत्ता ऊन आहे म्हणेपर्यंत दाटून येणारे काळे ढग.. आणि पाठ फिरावी इतक्यात वेगात पुढे सरकलेला पाऊस मग समजूतदार वाटतो..  

एकाच राज्यातल्या वेगवेगळ्या दिशांना जावं तसं अनुभवता येणारं परस्परविरोधी हवामान..इथेही पावसाची प्रतीक्षा असते..मागील काही वर्ष अग्नेय मौसमी वाऱ्यांमधून सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याची आकडेवारी आहे...  इथेही दुष्काळ असतो.. दुष्काळानं भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या बातम्याही वाचायला मिळतात.. मागच्या २०० वर्षात प्रचंड गंभीर दुष्काळांना ऑस्ट्रेलियन शेतकरी सामोरा गेला आहे.. मध्य ऑस्ट्रेलियात तर १९६३ सालचा दुष्काळ तर तब्बल ८ वर्ष म्हणजे १९६८ पर्यंत रखडला..  

एकाच देशात किंबहुना एकाच राज्यात बदलणारी घड्याळं, बदलणारे ऋतू दुसऱ्या खंडात आल्याची पुरेपूर जाणीव करून देतात.. हवामान विभागाच्या भाकितांचे व्हॉट्सअँप जोक करणारे आपण इथे येऊन मात्र इमानदारीत हवामान विभागाच्या अंदाजानुसारच दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स करतो.. आपल्या हवामान खात्याचा, त्यांच्या भाकितांचा आपण पार चोथा केलाय. पण इथे हवामान विभागाकडूनच त्यांच्या वेबसाईटवर अंदाज वर्तवणारे आणि सोप्या भाषेत सामान्यांना कळेल असे व्हिडिओ अपलोड होतात..त्यामुळे कदाचित यांची विश्वासार्हता वाढत असावी..देश समजून घेण्याची ही प्रोसेस फार मोठी असते.. त्यातही ज्या व्यवस्थेत आपण वाढलेलोही नाही त्या व्यवस्थेच्या नजरेतून समजून घेणं हा एक वेगळा अनुभव.. 

1 comment:

  1. महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete