Thursday 8 September 2016

A Train & A Tram...!
लहानपणी पुण्यात फर्ग्युसन रोडवरच्या दगडी घरात रहायचो.. लहानाची मोठी तिथेच झाले. त्यामुळे थंडीच्या दिवसात पहाटेच्या वेळी शिवाजीनगर रेल्वे  स्टेशनवरून येणारा रेल्वेच्या भोंग्याचा आवाज एकदम थ्रिलिंग वाटायचा..कधी कधी गूढही.. अगदी फक्त आपल्यालाच ऐकू येतोय की काय असं वाटायचं.. थंडीच्या दिवसात तर सवाई गंधर्व रंगात असताना बंदिशींचाही आवाज पोहोचायचा.. स्वत: गाणं शिकत असूनही जास्त भावायचा तो रेल्वेचा भोंगाच.. एकंदरीत काय तर असे आवाज अगदी मध्यरात्री ऐकू येत असल्यामुळे उत्सुकता खूपच वाढायची.. मग बाबांच्या मागे लागून शिवाजीनगर स्टेशनवर ट्रेन पाहायला जाण्याचा योग आला. अगदी नुकतच आठवायला लागलं असावं.. मग संध्याकाळी ७ नंतर ट्रेन पाहायला आम्ही शिवाजीनगरला पोहोचलो.. जेवढ्या वेळा त्यानंतर आम्ही तिकडे गेलो असू तेवढ्या वेळा इमानदारीत बाबांनी दोघांचं प्लॅटफॉर्म तिकिट काढून मग क्रॉस होणारी ट्रेन पाहिली आहे.. इमानदारीनं प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याचे ते दिवस होते.. रात्रीत लांबून दिसणारा ट्रेनचा ठिपका.. जवळ जवळ यायला लागल्यावर मी नकळत बाबांचा हात धरायचे.. आणि मग असं छातीवर दडपण आणत धडाधडा माझ्या समोरून ते धूड जायचं.. मला कोण सुपरगर्ल असल्याचा फिल यायचा.. मग बहुतांश वेळा ट्रेन पाहायला जाणे हा कार्यक्रम ठरलेला...

हे सगळं आता लिहायचं कारण आयुष्य गोल फिरून पुन्हा आपल्याला तशाच वळणावर आणून सोडतं.. भोवतालची माणसं, परिस्थिती, आपली परसेपशन्स बदललेली असतात कदाचित.. पण उत्सुकता तीच असते.. कारण मेलबर्नमध्ये आल्याच्या पहिल्याच दिवशी मला अत्यंत आवडणाऱ्या ट्रॅममध्ये बसले.. आणि लहानपणी दूरून दिसणारा तो लुकलुकणारा दिवा परत आठवला.. मग नंतर तर ज्या ठिकाणी फ्री ट्रॅम झोन आहे ती सिटी पाहण्यासाठी मी गौरवला घेऊन सिटी सर्कल ट्रॅम(जी माझी अत्यंत प्रिय झालीये..)त्यातच बसले.. आणि मेलबर्नमधल्या जेमतेम डेक्कन-कोथरूड एवढ्या भागात घिरट्या मारत होते.

मुंबईकरांसाठी लोकल, पुणेकरांसाठी टू व्हिलर जितकी जीव की प्राण त्यापेक्षा कमी असेल कदाचित पण इथल्या लोकांसाठी अशीच काहीशी ट्रॅम.. आता तर सिटीमधल्या एका ठराविक भागात, ज्याला सीबीडी,म्हणतात तिथे फुकट प्रवास करता येतो.. फुकट अधिक खुणावणं आपल्या रक्तातच आहे. पण फुकटच्या नावाखाली उल्लू बनवलं जात नाही अशी ही व्यवस्था.. लोकलसारखे आगाऊ बायकांचे अड्डे इथे ट्रॅममध्ये जमत नाहीत.. सतत बडबड नसते.. असली तरी अगदी तुला मलाच ऐकू येईल अशा आवाजात.. महत्वाचे रस्ते हाताच्या बोटावर मोजता येतील असे.. मग हॅपनिंग शहर संपतच.. मग पुढच सौंदर्य वेगळंच असतं..

२०१४ च्या आकडेवारूनुसार २५० किलोमीटरचा ट्रॅक, ४९३ ट्रॅम्स, २५ रूट्स, १७६३ ट्रॅम स्टॉप्स..असं पसरलेलं हे जगातलं सर्वात मोठं ट्रॅमचं जाळं..यानंतर बर्लिन,मॉस्को, व्हिएन्नाच्या ट्रॅम्स् येतात.. मेलबर्नची ही ट्रॅम अत्यंत सुटसुटीत.. अगदी स्वत: ची गाडी वाटावी अशी..  ट्रॅमच्या स्टॉप्सवर मायकी कार्ड रिचार्ज करण्यासाठीची मशिन्स.. शहराबाहेर जायला मायकी कार्ड पंच करायचं.. शहरातल्या शहरात तर सगळा प्रवास फुकटच आहे.. अत्यंत रेखीव, धिम्या गतीची ट्रॅम त्यामुळेच अधिक आकर्षित करते.. कधी ट्रॅमध्ये एखाद्यानं एन्रिके किंवा मायकल जॅक्सन साँग लावलेलं असतं.. मग त्या बॅकग्राऊंड म्यूझिकवर कुणीतरी रोमँटिक झालेलं असतं..एकमेकांच्यात पूर्णपणे बुडालेलं... ट्रॅम स्टॉप्सच्या शेजारी अत्यंत उत्तम दर्जाचे कलाकार रात्री थंड वाऱ्यात गिटार घेऊन गाणी म्हणत असतात तेव्हा ट्रॅमसाठी वाट पाहाणं जास्त आवडतं.. तो त्याच्या तंद्रीत गात असतो.. आपण आपल्या तंद्रीत ऐकायचं.. कधी हातात ब्रिझर घेऊन.. कधी नुसतीच कॉफी.. मग कधीतरी तो त्याचा गाशा गुडाळून अशाच कुठल्याशा ट्रॅममध्ये बसून पुढे रवाना होतो..

तर परवा शहराबाहेर जाण्याचा योग आला. ट्रॅममध्येच कार्ड पंच केलं आणि बसले.. शहराबाहेर १ स्टॉप संपत नाही तोवर एक माणूस मागे येऊन अत्यंत विनम्र आवाजात म्हणाला, हेलो..हाऊ आर यू?.. आता इथे सहज कुणी कुणाला हाय..सॉरी वगैरे म्हणतंच.. तर मग हे पण त्यातलच असेल म्हणून मी म्हणलं , हाय आय एम फाईन...??.. तर तो म्हणाला, आय एम सो सॉरी टू डिसर्ब यू, बट कॅन आय सी यूर मायकी कार्ड?..टू चेक?... तेव्हा मला कळलं ओके हा टीसी आहे.. इतका आदबीनं हसून बोलणारा टीसी पाहून वाटलं घे बाबा... इतका चांगला वागलास.. पंच केलं असीन तरी फाईन देऊ शकते मी.. वर्षानुवर्ष आपल्याला पाडल्या गेलेल्या सवयी अशा इकडे येऊन धक्का खातात.. टीसीच्या हाणामारीचे व्हीज बातमी म्हणून चवीचवीनं करताना, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असं काहीतरी होतंय याची जाणीव तरी होती का.. विचार आला, या टीसीला दिली असतील का या ट्रॅमच्या व्यवस्थेनं महिन्याची टार्गेट्स?.. किंवा कुणाच्या तुंबड्या भरण्याची घृणास्पद वेळ याच्यावर येत असेल का?.. पंच केलं नाही तर फाईन घेताना याला येत नसावेत ‘वरच्यांचे’ फोन्स.. आपलाच माणूस आहे सोड म्हणून..किंवा फाईन देताना कुणी अरेरावीत सांगत नसेल स्वत:ची ‘ओळख’.. व्यवस्था आपल्याला काही वेळेला असं म्हणायला भाग पाडते, की भ्रष्टाचार करा एकवेळ पण आम्हाला तरी बऱ्या सुविधा द्या, ज्या जगण्यालायक असतील. या व्यवस्थेत भ्रष्टाचार नसेल असं नाही.. पण सामान्यांना पावलोपावली, उठता बसता भोगावा लागत नाही हे महत्वाचं..

ट्रॅम स्टॉपवर रात्रीच्या वेळी उभं असताना लांबून दिसणारी ट्रॅम आजही शिवाजीनगरला घेऊन जाते कधीतरी... मनातल्या मनात असंख्य गोष्टींची तुलना करत राहतो आपण.. कुठली व्यवस्था किती खोलवर सडलेली त्यावर तिकडच्या माणसांचं जगणं,वागणं,चालणं,बोलणं अवलंबून असतं..
पण अर्थात एक गोष्ट अत्यंत म्हत्वाची आहे. – If people understood how the economic system works, there'd be a revolution in a minute- Henry Ford

7 comments:

  1. Wah !! Khupach chan lihilay... Very easy flow of thoughts..Asach lihit raha :)

    ReplyDelete
  2. Every Sant has a Past. Every Sinner has a Future. Excellent. Keep it Up.

    ReplyDelete
  3. Every Saint has a Past. Every Sinner has a future.

    ReplyDelete
  4. Every Saint has a Past. Every Sinner has a future.

    ReplyDelete